जिल्ह्यात पुन्हा बस प्रवासात महिलेचे दागिने चोरले; गुन्हा दाखल

अहमदनगर – बस प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधील एक लाख २६ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने दोन महिला चोरट्यांनी चोरून नेले आहेत. अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक ते राशीन (ता. कर्जत) बस प्रवासादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो कोतवाली पोलिसांकडे वर्ग झाला आहे.
आरती समाधान पाटील (वय ३० रा. दौलतनगर ता. देवळा जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी ९ मे, २०२२ रोजी राशीन येथे जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानक येथून अहमदनगर- बारामती बसमध्ये बसल्या होत्या. त्याचवेळी फिर्यादी यांच्यासोबत दोन महिला बसमध्ये बसल्या होत्या. दुपारी चार नंतर बस राशीन येथे पोहचली.
फिर्यादी घरी गेल्यानंतर त्यांना बॅगमधील दागिने चोरीला गेल्याची खात्री झाली. बसमध्ये बसलेल्या दोन अनोळखी महिलांनीच दागिने चोरले असल्याचा संशय फिर्यादीला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.