
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकताच दादारमधील शिवाजी पार्क येते गुढीपाडव्यानिमित्त मेळावा घेतला होता. या मेळाव्यात ठाकरे यांनी दिलेल्या भाषणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. राज्यातील राजकारणात देखील या भाषणामुळे वातावरण चांगलाच तापला आहे. राज ठाकरेंनी या भाषणामधून हिंदुत्ववादी भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ठाण्यामधील राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी देण्यासंदर्भातील कोणताच निर्णय घेण्यात आलेला नसल्याने ही सभा होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोर असलेल्या रस्त्यावर सभा घेण्यासाठी मनसेने अर्ज दिला आहे. मात्र त्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होण्याची शक्यता, ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्याचा विचार आहे ते ठिकाण, त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकीसंदर्भातील समस्या, ठाण्यातील राजकीय संघर्ष या सर्व गोष्टींचा विचार करता राज यांच्या या सभेला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच कारणामुळे मनसेकडून पर्यायी जागेची चाचपणी केली जात असून सभेला परवानगी मिळवण्यासाठी मनसे प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येतेय. राज यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ तारखेच्या नियोजित सभेवरुन ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये तुफान चर्चा रंगलीय. राज यांच्या सभेला परवानगी बुधवारी सकाळी दहावाजेपर्यंत तरी देण्यात आलेली नाही.