
राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले होते की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा. यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार” असं राज ठाकरे म्हणाले होते.
या प्रकरणावरून पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.
‘राजसाहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट आणली होती अन् ते म्हणाले होते मी शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट मध्ये आणणार. त्यामुळे राजसाहेब माझे आदर्श होते अन् म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला होता. पण आता राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलली आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे’, असे माजिद शेख यांनी स्पष्ट केले होते.