अनैतिक संबंधातून मुलीच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून अन्…; गुन्हा दाखल

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
नागपूर – अनैतिक संबंधातून (immoral relationship) पत्नीने (Wife) आपल्या मुलीच्या मदतीने पतीचा (Husband) खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर (Nagpur) शहरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपी पत्नीला अटक केली आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेश्वरनगर येथे ही घटना घडली. धमेंद्र गजभिये असे मृताचे नाव आहे तर निशा गजभिये असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
मागच्या काही दिवसांपासून निशा हीचा त्याच्या मित्रासोबत अनैतिक संबंध सूरु होता मात्र या संबंधात पती आड येत असल्यामुळे तिने मुलीच्या मदतीने पती धमेंद्र गजभिये याचा गळा आवळून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमेंद्र पत्नी आणि तीन मुलीसह राहत होता. तो खासगी ट्रकचालकाचे काम करत होता. पत्नी निशा गजभिये हिचे कुणा पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत, असा त्याला संशय होता. या कारणावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत होते.
यावरूनच तो मागच्या दोन महिन्यांपासून कामावरही जात नव्हता. त्याने आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. 10 एप्रिलला रात्री 11च्या सुमारास पती-पत्नीत यावरून वाद झाला. या भांडणात दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. धमेंद्र आणि निशा यांच्यात भांडण होत असताना तीन मुली दुसऱ्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. रात्री 1 वाजेपर्यंत त्यांचे भांडण सुरू होते.
यानंतर निशा आणि तिच्या 17 वर्षीय मोठ्या मुलीने धमेंद्रचा गळा आवळून खून केला. यानंतर निशाने भावाला फोन करून घरी बोलावले. निशाने दुसऱ्या दिवशी सकाळी पारडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पारडीचे ठाणेदार मनोहर कोटनाके, भरत शिंदे, उपनिरीक्षक रणदिवे घटनास्थळी गेले. त्यांना संशय आला.
संशयावरून हत्याकांड उघडकीस
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंख्याला लटकून धमेंद्रने आत्महत्या केली, असे निशाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पंख्याची पाहणी केली असता तो कुठेही वाकला नव्हता. त्याचप्रमाणे पंख्यावरील धूळ जशीच्या तशी होती. ज्या खुर्चीवर उभा राहून धमेंद्रने गळफास लावला त्या खुर्चीपासून पंख्यापर्यंत त्याचा हात पुरत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून निशाला ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी निशाला अटक करीत तिच्या मुलीला ताब्यात घेतले. पारडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.