
श्रीगोंदा – जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांचेकडील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना घरगुती वीज कनेक्शन देणे ही योजना सदोष राबवल्याच्या विरोधात आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ यांचे मनमानी कारभारा विरोधात वेळू, श्रीगोंदा येथील नाना राजू सांगळे आणि सांगळे वस्ती येथील ग्रामस्थ उद्या दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता विविध मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
याबाबत नाना सांगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, संत रविदास चर्मकार युवा महासंघ/ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमांतून समाजाच्या या प्रश्नासंदर्भात सदर उपोषण करण्यात येणार आहे.
या उपोषणामध्ये सदर योजनेत बसवलेले 63 kVA विद्युत रोहित्र सांगळे वस्तीत बसवण्यात यावेत, सवर्ण वस्तीतील सर्व विद्युत कनेक्शन काढून टाकण्यात यावेत, संबंधित योजनेचा चौकशी अहवाल चुकीचा व सदोष सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी..! या आणि विविध मागण्या पूर्ततेसाठी सदरील आंदोलन करण्यात येणार आहे.