अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण तात्काळ सुरू करावे

0 54
Training of senior and select teachers should be started immediately without taking more time
 
अहमदनगर  – लवकरच शाळा सुरु होणार असल्याने अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण तात्काळ सुरू करावे व 90 हजार पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षण घेणार असल्याने गटवारी करून त्याचे नियोजन करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले.

एका कार्यक्रमानिमित्त शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व शिक्षण संचालक टेमकर शहरात आले असता, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी त्यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी कल्पना काळोखे, कल्पना भामरे, अजिंक्य झेंडे, कुटे सर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण सुमारे सहा ते सात वर्षापासून अद्याप पर्यंत झालेले नाही. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेळोवेळी प्रशासनाकडे व मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केलेला आहे. शिक्षक परिषदेने या प्रश्‍नासाठी अनेकदा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांना निवेदन देऊन पाठपुरावा करुन एमसीईआरटी यांनी दिलेल्या 15 मे ते 14 जून हा प्रशिक्षणाचा कालावधी पाळण्याची मागणीही करण्यात आलेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मागील दोन वर्षांमध्ये विना प्रशिक्षण निवड व वरिष्ठश्रेणी शिक्षकांना मिळू शकलेली नाही. कारण शासनाकडून प्रशिक्षणाची सोय करण्यात आलेली नव्हती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रयत्न करून प्रशिक्षणाची अट शिथील करून वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्यासंदर्भात माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने परिपत्रक काढले होते. मात्र राज्यातील सर्वच लेखाधिकार्‍यांनी आक्षेप घेऊन वरिष्ठ व निवडश्रेणी देण्याचे टाळले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रशिक्षणासाठी सतत दोन वर्षे पत्रव्यवहार केला. 23 मार्च रोजी मुंबई येथे अनेक आमदार व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी विना प्रशिक्षण वरिष्ठ व निवडश्रेणी देण्याची मागणी फेटाळून लावली. त्या बैठकीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक यांनी 15 मे 14 जून 2022 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती दिली होती. संघटनेने 30 एप्रिलपर्यंत प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी सुचवले होते. परंतु त्यावेळी ते प्रशिक्षण झाले नसल्याचे नमुद केले आहे.
उन्हाळी सुट्टी संपत असून, अजूनही प्रशिक्षण झालेले नाही. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने शिक्षण मिळण्यास काही प्रमाणात अडचणी आल्या. त्यामुळे जून मध्ये राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांना सुरुवातीपासून लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणून प्रशिक्षण लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशिक्षण संदर्भात शिक्षक बांधवांकडून वारंवार विचारणा होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
प्रशिक्षण संदर्भात संपूर्ण कार्यवाही झालेली आहे. 15 ते 20 मे दरम्यान प्रशिक्षण सुरू केले जाईल, शिक्षक परिषदेच्या 13 मे च्या सहविचार सभेत संचालक स्तरावरून सांगण्यात आले होते. आज 21 तारीख होऊन गेली असूनही, आतापर्यंत राज्यातील नोंदणी केलेल्या शिक्षकांना ईमेल, पासवर्ड किंवा मोबाईलवर प्रशिक्षण सुरू होण्या संदर्भात संदेश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अधिक कालावधी न घेता प्रशिक्षण तात्काळ सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 2,222
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: