
श्रीगोंदा :- श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, नगराध्यक्ष पती तसेच विद्यमान नगरसेवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे यांच्यावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनोहर पोटे यांची नगराध्यक्ष व काँग्रेसच्या पदावरून हकालपट्टी करावी अन्यथा त्यांच्या घरावर संभाजी ब्रिगेड च्या वतीने दंडुके मोर्चा काढला जाईल तसेच या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून मनोहर पोटे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करत सतिष बोरुडे यांना न्याय द्यावा अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या कार्यालयाची संभाजी ब्रिगेड स्टाईलने तोड फोड करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस (Tilak Bhos) यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर झालेल्या आक्रोश मोर्च्यात दिला.
श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे याच्यावर दि.२३ रोजी सुपारी देऊन प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत मनोहर पोटे यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी करण्यात येऊन त्यांच्यावर श्रीगोंदा पोलिसांनी करवाई करावी यासाठी संभाजी ब्रिगेड तर्फे सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना टिळक भोस यांनी सांगितले की श्रीगोंदा शहराच्या विकास कामांचा कांगावा करत विकास कामांच्या नावाखाली सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून शहरात शिस्त राहिली नसून शहरात अनेक नगरसेवकांचे अवैध धंदे सुरू आहेत. दशक्रिया विधीच्या ठिकाना जवळ असलेल्या बापुशेठ गोरे यांच्या अमृततुल्य दारूमुळे तसेच हॉटेल मधील बिर्यानी मुळे दशक्रिया विधीच्या ठिकाणी कावळे देखील येत नसल्याची टीका केली. नगरसेवक अशोक खेंडके यांचे वडील गुलाबराव खेंडके यांच्याकडील गांजाला का जोरदार मागणी आहे. कारण त्यांच्याकडे कळीचा माल मिळतो.असे सांगत श्रीगोंदा नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या कारभारावर ताशेरे ओढत पोलिसांच्या कारभारावर देखील सडकून टीका केली. यावेळी संतोष इथापे, प्रदीप खामगळ, दिलीप लबडे, ॲड.दिपाली बोरुडे, ऋषिकेश गायकवाड, ॲड.संभाजी बोरुडे, ॲड.समित बोरुडे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मनोहर पोटे याची आर्थिक प्रक्रिया हाताळणाऱ्या तालुक्यातील घुगल वडगाव येथील एका बड्या अधिकाऱ्याची चौकशीची मागणी करणार असून त्या अधिकाऱ्याच्या सर्व मालमत्ता तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या नावावर असून ते सर्व पुरावे गोळा केले असून लवकरच त्याचा पर्दाफाश करणार असल्याचे टिळक भोस यांनी यावेळी सांगितले.