झेंडा लावण्याच्या वादावरून दगड फेक; अचलपूरमध्ये संचारबंदी लागू

प्रतिनिधी DNA मराठी टीम
अमरावती – रविवारी रात्री अचलपूर(Achalpur) शहरातील दुल्हा गेटवर दोन गटामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली . त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. जमावाने पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक केली या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस बंदोबस्तासाठी तीन SRPFच्या कंपन्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अमरावती ग्रामीणचे 150 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तर अकोला येथील 100 अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय
रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. तर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडण्यात आलं.
याप्रकरणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून 16 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अचलपूर शहरामध्ये शांतता आहे. शहरात केवळ रस्त्यावर पोलीस असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच आवाहन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नये म्हणून सोशल माध्यमांवर बंदी टाकण्यात आलेली आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी केलं आहे.