
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तरसभामध्ये महविकास आघाडी सरकारवर (MVA) जोरदार टिका केली आहे. विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांवर त्यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवरवर आता महविकास आघाडी सरकारकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहे. नुकताच संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी देखील राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रीया दिली आहे.
आज मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत मध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) घेतलेली मराठीविरोधी भूमिका आणि मुंबई तोडण्यासाठी केलेल्या सादरीकरणाचं समर्थन करणार असाल तर माझ्यावर जरुर टीका करा. पण तुमची भूमिका बदलली असेल तर किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करा, त्याच्यासमोर झुका आम्हाला काही म्हणायचं नाही. पण मराठी माणूस हे सहन करणार नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
शिवराळ भाषा वापरण्यावरुन केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी आपल्याला गर्व असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी शिवराळ भाषेवरुन केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “होय…बरोबर आहे. पण ज्यासंदर्भात मी शिवराळ भाषा वापरली त्या शिवराळ भाषेचं कौतुक करायला हवं होतं कारण कालपर्यंत मराठी अभिमानी म्हणून ते मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच तारणहार आहोत, शिवसेना नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जर माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं मराठीप्रेम दिसलं असतं”.
किरीट सोमय्यांविरोधात वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला आणि शिवसेनेला गर्व आहे. माझी उद्धव ठाकरेंशी यावर चर्चा झाली. किरीट सोमय्यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती. याच किरीट सोमय्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी कोर्टात धाव घेतली होती त्यांच्याविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. हेच किरीट सोमय्या आणि त्यांचे अमराठी बिल्डर्स, फंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी सादरीकरण तयार केलं आहे. मुंबई महााराष्ट्रापासून तोडावी, मराठी माणसाचा अधिकार असू नये यासाठी सादरीकरण तयार असून दिल्लीत जाऊन सतत लॉबिंग करत आहेत. किरीट सोमय्या आणि काही बिल्डर्स सूत्रधार आहेत असं समजल्यानंतर तोंडातून शिवी बाहेर पडली असेल तर मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि उत्तेजन देईल. हा शिवसेनेच्या तोंडातून निघालेला अंगार आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
तर भोंग्यावर बोलताना राउत म्हणाले ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्याने हा भोंगा वाजू लागला आहे. खोट्या कारवायंविरोधात आम्ही लढत आहोत, आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, खोटं बोला पण शिवसेना, महाविकास आघाडी भक्कम आहे,” असं राऊत म्हणाले,. तसंच एका वैफल्यातून, निराशेतून असे भोंगे वाजत आहेत असंही ते म्हणाले. भाजपाने आमच्याविरोघात भोंगे वाजवले त्याचा फायदा झाला नाही म्हणून नवीन भोंगे लावलेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.