प्रियकराशी बोलत होती तरुणी; अचानक बापाने घेतली एन्ट्री अन् घडलं असं काही ..

पाटणा – प्रियकरासोबत (boyfriend) बोलत असल्याने बापाने २० वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहार राज्यात घडली आहे. राज्यतील दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर बापाने तिचा मृतदेह नदीत फेकून दिला होता मात्र हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर मृताची आई, बहीण आणि मामा यांनी ही ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांना दिली आहे.
उस्मान असे आरोपी पित्याचे नाव आहे. तर आफरीन असे मयत २० वर्षीय तरुणीचा नाव आहे. आफरीनचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती. आफरीनला आपल्या प्रियकरासोबत बोलण्यास वडिलांनी मनाई केली होती. मात्र, असे असतानाही आफरीन तिच्या प्रियकराशी लपूनछपून बोलायची. असेच एक दिवशी ती तिच्या प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. यावेळी तिचा पिता आला आणि प्रियकराशी बोलताना पाहून संतापला. यानंतर त्याने रागाच्या भरात आफरीनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या करुन टाकली. यानंतर हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह हा नदीत फेकून देण्यात आला होता.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून महिला हेल्पलाइनच्या प्रकल्प व्यवस्थापक अजमनुत निशा यांनी मोरो पोलीस ठाण्याला या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची शिफारस केली. या संपूर्ण प्रकरणाची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर खळबळ उडाली आहे. मोरो पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर दरभंगाचे एसएसपी आकाश कुमार म्हणाले की, हे प्रकरण ऑनर किलिंगचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. ऑडिओ क्लिपच्या आधारे कारवाई करण्याचे सांगितले आहे.