बिबट्याला ठोसे लगावून शेपूट आणि पाय ओढून पत्नीने वाचविला पतीचा प्राण

अहमदनगर – बिबट्याने जबड्यातील आपल्या पतीचे डोके सोडविण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता अक्षरश: बिबट्याला ठोसे लगावून शेपूट आणि पाय ओढून पत्नीने पतीचा जीव वाचविला आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा येथे ही घटना घडली आहे. संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे. गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव आहे.
पारनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत असणा-या दरोडी चापळदरा भागात पावडे कुटुंब वास्तव्यास आहे. मध्यरात्रीची दोनच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरख हे पाहण्यासाठी गोठ्यात गेले. त्याचवेळी बिबट्याने गोरख यांच्यावर हल्ला केला.
बिबट्याने गोरक्ष त्यांचे डोके आपल्या जबड्यात घेतले,त्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. तो आवाज ऐकून त्यांची पत्नी संजना यांनी गोठ्याकडे धाव घेतली आणि त्यांनी कसलाही विचार न करता बिबट्याच्या शेपटीला धरून त्याला मागे खेचले. एका हाताने पाय धरला तर दुसऱ्या हाताने पोटात मारले त्यातच आपल्या मालकावर हल्ला झाल्याचे पहात त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला, गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे आपलीच शिकार होते की काय असं वाटू लागल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.