राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणं हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाने उद्यापासून अर्थात १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. “शोभायात्रांना काही ठिकाणी परवानगी मिळाली असून मुंबईसह अन्य भागातील पोलीस राज्य सरकारच्या कोरोना निर्बंध शिथिलीकरणाच्या सूचनांची वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल केले जातील, असे नमूद केले होते.