
श्रीरामपूर – सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाच्या १० मार्च २०२२ पासून सुरु झालेल्या टप्यांपासून निवडणुकीची कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले असून या अनुसरुन प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीपासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारीत कार्यक्रमानुसार सोमवार दि. ६ जून २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याची माहिती श्रीरामपूर (Shrirampur) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
प्रारुप प्रभागरचनेच्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिध्द करण्याचा दि. १० मे २०२२ असून त्यावर हरकती व सूचना करण्याच्या कालावधी मंगवार १० मे २०२२ ते शनिवार दि. १४ मे २०२२ पर्यत मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद यांच्याकडे सादर कराव्यात.
सोमवार २३ मे २०२२ रोजी प्राप्त हरकतींवर व सुचनांवर सुनावणी होणार आहे. सोमवार दि. ३० मे २०२२ पर्यंत हरकती सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून राज्य निवडणूक आयुक्त /विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठविले जाणार आहेत. त्यानंतर ६ जून २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे. मंगळवार दि. ७ जून २०२२ पर्यंत अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात तसेच स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.