अहमदनगर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली सुरु झालेल्या असल्या तरी त्या छुप्या आहेत. अद्याप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट, गणांच्या प्रारुप रचना अंतिम झालेली नाही. त्यामुळे ते होईपर्यंत इच्छुक लक्ष ठेऊन आहेत.
जिल्हा प्रशासनाने गट व गणांची पूनर्रचना करुन एकूण 85 गट आणि 170 गणांचा कच्चा आराखडा यापूर्वीच निवडणूक आयोगाला सादर केला आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 42 हजार लोकसंख्येला एक गट व 22 हजार लोकसंख्येसाठी एक गण असे प्रमाण ठरविण्यात आले.
त्यानुसार अकोले व पाथर्डी वगळता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे नवीन 12 जिल्हा परिषद गट तयार करण्यात आले. त्याच्या दुप्पट 24 गण निर्माण झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद गटांची एकूण संख्या 85 तर चौदा पंचायत समित्यांच्या गणांची संख्या 170 झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विद्यमान सदस्य व पदाधिकारी यांची मुदत 20 मार्चला संपली आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक आहे.