
मुंबई – राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शातच खुद्द देशाचे सरन्यायाधीश एन. वही. रमणा (N. V. Ramana) यांनीच प्रमुख केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयच्या विश्वासार्हतेविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या सर्व तपास यंत्रणावर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा उभी करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
सुरुवातीच्या काळात सीबीआयवर लोकांचा प्रचंड विश्वास होता, असं न्यायमूर्ती रमणा म्हणाले आहेत. “सीबीआयवर लोकांचा खूप विश्वास होता. खरंतर स्वतंत्र यंत्रणा आणि पारदर्शी कारभार यामुळे सीबीआयकडे प्रकरण वर्ग करण्यासाठी न्यायव्यवस्थेकडे मोठ्या संख्येनं विनंती येत होत्या. जेव्हा जेव्हा नागरिकांना स्थानिक पोलिसांच्या पारदर्शी तपासावर विश्वास राहिला नाही, तेव्हा लोकांनी न्याय मिळवण्यासाठी सीबीआय तपासाचीच मागणी केली आहे”, असं रमणा म्हणाले. १ एप्रिल रोजी सीबीआय स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.
न्यायमूर्ती रमणा यांनी सीबीआयचं कौतुक करतानाच कालानुरूप हे गणित बदलल्याचं नमूद केलं. “जसा काळ पुढे सरकला, इतर कोणत्याही नामांकित संस्थेप्रमाणेच सीबीआयच्या कामाचं देखील लोकांकडून काटेकोरपणे मूल्यमापन केलं जाऊ लागलं. काही प्रकरणांमध्ये सीबीआयची कृती किंवा निष्क्रियता यामुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता सीबीआय, एसएफआयओ, ईडी अशा तपास यंत्रणांना एकाच नियंत्रणाखाली आणण्यासाठी नव्या संस्थेची निर्मिती करणं आवश्यक झालं आहे”, असं रमणा यांनी नमूद केलं.