
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचं वातावरण तयार केलं जात आहे. मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केलं, त्याचं नावच महाविकास आघाडी (MVA) असं ठेवलं आहे. महाविकास हे केवळ आपल्या नावामध्ये नाही तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो आहोत असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला आहे. ते आज जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “एक वातावरण तयार केलं जातय, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केलं, त्याचं नावच महाविकास आघाडी असं ठेवलं आहे. महाविकास हे केवळ आपल्या नावामध्ये नाही तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो आहोत.” याचबरोबर, “आपण आपल्या राजकीय आयुष्यात पाहीलेलं आहे, अनेकदा घोषणा होतात, नारळवाल्यांचा खप जोरदार होतो, कारण अनेकवेळेला अनेकजण नारळ फोडतात आणि मग त्या कोनशीला तशाच असतात. कारण नंतर त्या शीलेला कोणी विचारतच नाही, म्हणून तिला कोनशीला म्हणतात की काय मला कल्पना नाही. परंतु तसं नाही आजचं भूमीपूजन हे केवळ नारळ फोडण्यासाठी नाही. प्रत्यक्ष काम आजपासून सुरू करत आहोत आणि हे आपल्या कामाचं एक उदाहरण जे सगळ्यांसमोर ठेवतोय. ते पाहिल्यानंतर मग जो आपल्यावरती रुसवा, फुगवा किंवा आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या ते उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही, कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या ते मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून दिलेलं हे चोख उत्तर आहे.”असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.
भूमिपूजनाचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवारांना
तर, “जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवार यांना आहे. त्यांनी आणि या सरकारने प्रत्यक्ष या इमारतीच्या जागेसाठी पाठपुरावा केला, अनेक परवानग्या मिळवल्या. मागील दोन वर्षे आपण प्रत्यक्ष कामात दिसलो नव्हतो पण त्यापाठीमागे आपण अनेक विकास कामांचे नियोजन केलं. त्यातूनच आजच्या पर्यावरणपूरक नवीन वास्तूचे भूमिपूजन होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम आहे.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचं कौतुकही केलं.
यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.