मुंबई – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) मध्ये जाहीर सभा घेणार आहे. या सभेमध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील आता औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांना आज ऑनलाईन मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात शिवसेनेच्या राज्यभर सभा होणार असल्याचे सांगत, १४ मे रोजी मुंबईत बीकेसी येथे आणि ८ जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभा होणार असल्याची माहिती दिली.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांना राज्यभरातील शिवसैनिकांना एक संदेश दिला आहे. संघटना बांधणीत कुठेही मागे राहता कामा नये, हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. ढोंगाचे बुरखे फाडावेच लागतील. विशेषता जे बनावट हिंदुत्ववादी आहेत, त्यांचं आव्हान वैगेरे आम्हाला काही नाही, आम्ही लढू. १४ तारखेला बीकेसी मध्ये सभा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभेसाठी येणार आहेत आणि महाराष्ट्रात फिरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. शिवसेना पक्ष प्रमुखांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे, पण ते भाष्य हे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होतं. अनेक विषयांवर ते आक्रमकपणे बोलले आहेत, जोरदार पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं वक्तव्य हे पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहे. असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.