रोजच बिबट्याच्या दर्शनाने टाकळीकर हैराण वन विभाग मात्र गाढ झोपेत ?

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या गावात रोजच बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने तसेच प्राण्यावर होणारे रोजचे हल्ले यामुळे परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात भयभीत झाली आहे मात्र याबाबत वनविभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे नागरीकातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या गावात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे पाऊलखुणा दिसत आहेत तर काही नागरिक एक बिबट मादी आणि चार बछडे पहिले असल्याचा दावा करत आहेत तर काही ठिकाणी सुरवातीला टाकळी कडेवळीत गावच्या नजीक असलेल्या आधोरेवाडी शिवारात बिबट्याने दोन शेळ्यांचा फडश्या पाडला होता त्यानंतर टाकळी गावातील वऱ्हाडदेवी रोडवर राहणाऱ्या अरुण इथापे यांच्या घरासमोरील बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला त्यावेळी वऱ्हाडदेवी परिसरातील अनेक लोकांनी बिबट्या पहिला त्यानंतर टाकळी गावातील सोनवणे वस्ती नजीक शेतात खंडू कोपनर यांचे बकरे बसले होते.
त्या बकऱ्यांच्या बसलेल्या कळपावर बिबट्याने हल्ला चढविला होता त्यात दोन बकरी मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते त्यानंतर कोणाच्या केळीच्या बागेत तर कधी रस्त्यावर तर कधी उसात असे अनेक ठिकाणी बिबट्याचे लोकांना नेहमी दर्शन होत आहे त्यामुळे या परिसरातील भय इथले संपत नाही असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही मात्र याबाबत वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी याना अनेकदा माहिती देऊनही वनविभाग मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे नागरीकातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
तर एका घालमे नावाच्या वनरक्षकानेपाहणी केल्यानंतर हे बिबट्याचे ठसे आहेत मात्र आता याला काही पर्याय नाही आपल्याला त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे असा अजब सल्ला त्यांनी दिल्याने नागरिकांतून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
अधोरेवाडी परिसरात पिंजरा लावलाय – बोगे
श्रीगोंदा तालुक्यातील आधोरेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली त्यावरून आधोरेवाडी परिसरात बिबट्यासाठी पिंजरा लावला आहे मात्र तो वन्यजीव असल्यामुळे तो सारखा फिरत राहत आहे त्यामुळे बिबट्या अजूनही जेरबंद झालेला नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकारी बोगे यांनी केले आहे.