कर्नाटक राज्यातून श्रीगोंदयासह जिल्ह्याला गुटख्याचा पुुरवठा

श्रीगोंदा :- राज्यात तंबाखूजन्य पदार्थांना बंदी असतांनाही परराज्यातून मोठ्या प्रमाणावर तंबाखू जन्य पदार्थ श्रीगोंदयासह जिल्ह्यात आयात होत आहे. कर्नाटक(karnataka) राज्यातून दरमहा श्रीगोंद्यामध्ये 200 पोते गुटख्याचे येत असून त्यातील 100 पोते हे एकट्या ग्रामीण भागात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोठ्या प्रमाणावर गुटखा श्रीगोंदा तालुक्यात विकला जात असतांना अन्न व भेसळ प्रशासन व पोलीस खाते यांनी डोळ्यावर पट्टी बांधली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुटखा उत्पादन व विक्रीला बंदी आहे. बंदीच्या काळातही श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम बेकायदेशीर गुटख्याची विक्री सुरू आहे. या गुटखा व्यवसायाची मोठी साखळी कार्यरत आहे. त्यात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सामील आहेत शहरातील एका व्यक्तीकडे गुटखा विक्रीचे संपूर्ण जिल्ह्याचे काम देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर व्यक्तीने आपल्या दलालांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात गुटखा विक्री प्रतिनिधी नियुक्त केले आहे. याच व्यवसायातून श्रीगोंदा तालुक्यात दोन गुटखा किंग उदयास आले आहे. तालुक्यासह जिल्ह्यासाठी कर्नाटक राज्यातून गुटखा पुरवठा सुरू आहे.
एक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक कर्नाटकातून सोलापूर मार्गे अहमदनगरला हा गुटखा आणत असल्याची चर्चा आहे. श्रीगोंदा येथे हा गुटखा साठविण्यात येवून तेथून जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सदर माल पुरविला जात आहे. या बेकायदेशीर व्यवसायामध्ये अनेकांचे हात ओले होत असल्याने कुणीही त्यावर कारवाई करताना दिसत नाही.
गुटख्याच्या एका पोत्याची किंमत 14 हजार रुपये असून तालुक्यासह जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा व्यवसायातून रोज 42 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये एकट्या श्रीगोंदा तालुक्यात तब्बल 14 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.