
अहमदनगर – शहरात अवैध व्यवसाय आणि बेकायदेशिर अतिक्रमण हे वाढलेले आहे त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हे अतिक्रमण तसेच अवैध व्यवसाय पूर्ण बंद करण्याच्या कडक सूचना पोलिस आणि महानगर पालिका प्रशासनास दिले असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
तनपुरे कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरल्याने आमच्यावर आरोप – खा. विखे
नगर शहरात कापड व्यापाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या नंतर जखमी दीपक नलवानी यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. याभेटी नंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गुन्हेगारीचे मूळ कारण शहरात उशिरा पर्यंत सुरू असलेल्या अवैध व्यवसाय आणि यातूनच वाढलेले अतिक्रमण हे आहे. पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका यांना हे अतिक्रमण काढण्याच्या कडक सूचना दिल्या असून यावर कारवाई सुरू देखील झाली आहे.
या घटनेची चौकशी सुरू असून चौकशी अंती जे सत्य समोर येईल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातील लोकांची एक बैठक घेण्यात येवून या बैठकीत ज्या काही सूचना येतील त्यावरून मार्गदर्शक तत्व तयार करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगून येत्या आठवड्यात हे सर्व होईल असे यावेळी सांगितले. शहरातून जाणाऱ्या विविध मिरवणुकांनाचे मार्ग देखील लवकरच ठरविण्यात येणार असून कुठल्याही जयंती,उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या भेटी दरम्यान जखमी दीपक नलवानी यांच्या कुटुंबीयांशी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केली.