
प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर – उन्हाळयात विद्युत महावितरण कडून होत असलेल्या भारनियमनमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहे. केडगाव येथील शितल कॉलनी, हनुमान नगर, इंदिरा नगर व विद्या नगर भागात रात्री आठ ते दहा तासाचे होत असलेले भारनियमन त्वरीत थांबविण्याच्या मागणीचे निवेदन सहारा प्रतिष्ठान, रेणुकामाता महिला मंडळ व स्थानिक नागरिकांच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालयात देण्यात आले. अन्यथा नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबरनाथ भालसिंग, रेणुकामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता पवार, गणेश नन्नावरे, शितल नाडे, उषा गोरे, अनिता बेंद्रे, मनिषा थोरवे, सरस्वती भगत, रेखा मोर्या, शुभांगी लोणकर, सुनिता रोडे, जयश्री रासकर, शकीला पठाण, पल्लवी चोभे, निर्मला इंगळे, विश्वास काळे, दिपक आल्हाट, प्रविण शिंदे, अमोल भालसिंग आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केडगाव येथील शितल कॉलनी, हनुमान नगर, इंदिरा नगर व विद्या नगर येथे विद्युत महावितरण विभागाच्या वतीने रात्री आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. उन्हाळ्यात उकाडा वाढत असताना नागरिकांना रात्री घरी थांबणे देखील असह्य झाले आहे. सदर भाग महापालिका हद्दीत येतो. मात्र येथील विद्युत कनेक्शन हे अरणगाव या ग्रामीण भागाशी जोडण्यात आले आहे. नागरिक महापालिकेचे सर्व कर भरत असून, महापालिका हद्दीत प्रमाणे कमी वेळेचे भारनियमन आवश्यक आहे. अन्यथा सदर भाग देखील ग्रामपंचायतीमध्ये विलीन करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.