
मुंबई – आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभामध्ये बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरुनही भाजपाला घेरले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना एकाच वेळी उत्तर देणे शक्य नसले तरी याचा अर्थ असा नाही की त्यांनी मांडलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेणार नाही. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधाणिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या पाहिजेत. एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घेऊ शकतात, पण राज्याची संस्कृती आहे प्रथा-परंपरा आहे. राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरु केल्यानंतर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. राज्यपाल काय बोलत आहेत ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होते. त्यावेळी केलेला दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले. राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मद्यराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची बदनामी करणे योग्य नाही – उद्धव ठाकरे
ज्यांसाठी हे करत होत ते या योजनांचा लाभ घेत आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत याचेसुद्धा मला समाधान आहे. माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये माझी उणिव न भासू देता सगळ्या मंत्र्यांनी उत्तम काम केले त्यांच्याबद्दलही मला समाधान व्यक्त करायचे आहे. जे झाले आहे ते झोलेले आहे आणि नाकारण्याचा नाकर्तेपणा कोणी करु नये. सुधीर मुनगंटीवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात. वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही तर सुपर मार्केटमध्ये मिळणार आहे. आपल्या बाजूला असलेल्या मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का? देशात एक लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. हे पाहून आपल्या राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. आपण केलेला विकास राज्यपाल सांगत होते तो आपण समोर येऊ दिला नाही. याची दखल नागरिक घेत असतात.
रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत होता. पण काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.