
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – एसटीच्या कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी आंदोलन करत हल्ला केला. यावरूनच आता आरोप- प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय असून या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भूमिका मांडली.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करायला हवा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, मागील कित्येक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मात्र एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्याने त्यांचा उद्रेक झाला असून त्यातून हा हल्ला झाला आहे. पण अशा प्रकारचा हल्ला करणे योग्य नसून ही घटना निंदनीय आहे.
शरद पवार यांच्या घरी हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे सरकारच या हल्ल्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, हल्लेखोर एसटी कामगारांना कामावर घेणार नाही, अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी मांडली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कामगारांना कामावर न घेण्याची भूमिका देखील चुकीची आहे.
तर, जेएनयू विद्यापीठात झालेल्या घटनेबाबत विचारले असता आठवले म्हणाले की, “देशातील सर्वात महत्वाचे जेएनयू विद्यापीठ असून तिथे अनेकदा वादाचे प्रकार घडले आहेत. कालची घटना लक्षात घेता, विचाराधारा वेगळी असली तरी देखील प्रत्येकाला काम आपले काम करण्याचा अधिकार आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाले, अशा घटना होता कामा नये. या घटनेची चौकसी करून कारवाई झाली पाहिजे.” अशी भूमिका त्यांनी मांडली.