
मुंबई – शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर एस टी कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती. त्यांची आज दोन दिवसांची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला, त्यावेळी नागपुरातून फोन कॉल येत होता, एक व्हॉट्सॲप ग्रुपही तयार करण्यात आला होता. नागपुरातून ज्यांनी फोन केला होता, त्यांचे नाव आम्ही उघड करणार नाही असे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले. असं युक्तीवाद यावेळी सरकारी पक्षाकडून प्रदीप घरत यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ८० लाख रुपये वसूल केले गेले, हे पैसे कुठे गेले, कोणत्या ठिकाणी वापरले गेले याबाबत माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाकडून न्यायालयात नमूद करण्यात आले. सदावर्तेंच्या व्हॉट्सॲपमध्ये बारामतीचा उल्लेख होता, युटूयब चॅनेल्सचा षड्यंत्रात वापर करण्यात आला. एमजेटी या युट्यूब न्यूज चॅनेलचा चंद्रकांत सूर्यवंशी फरार आहे. काही पत्रकारांना हल्ल्यावेळी बोलावलं गेलं अशीही माहिती देण्यात आली.
हा नियोजित कट असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी साक्षीदार शोधण्यासोबत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधारे पोलीस अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वाढीव कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या 109 आंदोलकांनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतल्यास, पोलीस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करणार आहेत.
पोलिसांनी रविवारी सकाळी अॅड. सदावर्ते यांना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून गावदेवी पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस उपायुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी रविवारी आझाद मैदान तसेच तेथून ‘सिल्व्हर ओक’च्या दिशेने जाणार्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अटक केलेले आंदोलक दिसत असलेले चित्रीकरण पुरावा म्हणून ताब्यात घेतले. त्याआधारे पोलीस अन्य संशयित आरोपी आहेत का, याचाही मागोवा घेत आहेत.
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनचे तपशील मागवून ते कोणा-कोणाच्या संपर्कात होते, याचीही तपासणी सुरू केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या 109 आंदोलकांनी सोमवारी जामिनासाठी अर्ज केल्यास पोलिसांकडून विरोध करण्यात येईल. आरोपींना जामिनावर सोडल्यास ते पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे जामिनावर सुटल्यानंतर ते अन्य आरोपींना पळवून लावू शकतात, असा दावा पोलीस करणारत असल्याचे समजते.
पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आझाद मैदानात चिथावणीखोर भाषण केल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ रेकॉर्डिंग तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पाच अंमलदारांचेही जबाब सादर केले जाणार आहेत.