धक्कादायक ! अज्ञात कारणातून पती-पत्नीची आत्महत्या; परिसरात खळबळ

परभणी – परभणीतील सेलू शहरात राजीव गांधी नगरमध्ये अज्ञात कारणातून पती-पत्नी (Husband-Wife)ने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन गणेश आवटे (32) आणि प्रियंका अर्जुन आवटे (28) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत.
अर्जुनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सेलू शहरात विविध चर्चांना उधाण आला आहे.याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची सत्यता तपासण्यात येणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अर्जुन आणि प्रियंका यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. अर्जुन सेलू शहरात ऑटोरिक्षा चालवून उपजीविका करत असे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र सकाळी उशिर झाला तरी उठले नसल्याने अर्जुनची बहिण प्रियंकाने दरवाजा ठोठावला. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे प्रियंकाने वडिलांनी याची माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता दोघे मृतावस्थेत आढळले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रियंकाचे आई-वडील पोहचले नसल्याने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच शवविच्छेदनही करण्यात आलेले नाही, अशी माहिती सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाढ यांनी दिली आहे.