धक्कादायक ! बोगस जामीनदारांचे रॅकेट उघड; 17 जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
नाशिक – नाशिक (Nashik) जिल्ह्यात बोगस (Bogus) जामीनदारांचे रॅकेट उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठराविक रक्कम घेऊन या जामीनदारांनी अनेक आरोपींना जामीन मिळवून दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारात पोलिसांनी आता पर्यंत १७ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा सत्र न्यायालयात काही ठराविक लोक बोगस कागदपत्रे, दस्तावेज आणि सतत वेगवेगळी नाव धारण करत विविध प्रकरणात जामीनदार म्हणून उभे रहात होते. त्यात जावेद पिंजारी, राजू वाघमारे, इकबाल पिंजारी, लक्ष्मण खडताले, मधुकर जाधव, युवराज निकम हे पाच जण आणि त्यांच्या साथीदार महिलांनी अनेकांचा जामीनदार होत जामीन मिळवून दिल्याचे समोर आले आहे.
या रॅकेटने आता पर्यंत विविध फौजदारी आणि इतर गुन्ह्यात जवळपास 81 जणांना जामीन मिळवून दिल्याचे समोर आले आहे. त्यात प्रत्येक जामीनासाठी ठराविक रक्कम आकारली जायची. आतापर्यंत या संशयितांनी किती जणांना जामीन मिळवून दिला, याचा ठोक आकडा सध्या शंभरच्या घरात आहे. मात्र, ही संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. असे असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. शिवाय यांचे इतर साथीदार कोण आहेत, न्यायालयाच्या आवारातील इतर वकील किंवा आणखी कोणाशी त्यांचे लागेबांधे आहेत का, याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.