धक्कादायक… शुल्लक कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला; गुन्हा दाखल

अहमदनगर- मजुरी काम करणाऱ्या तरूणावर दोघांनी कोयत्यांनी हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भिंगार शहरातील पंचशिल कमानीजवळ ही घटना घडली. तरुण उर्फ बाबू राजन भुलैया (वय २५ रा. सौरभनगर, भिंगार) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दोघांविरूध्द खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी शंकर निकाळजे, अभिलेख धमेंद्र वाघेला (रा. गौतमनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
२ जून रोजी रात्री बाबू भुलैया भिंगारमधील पंचशिल कमानीजवळ असताना सनी निकाळजे, अभिलेख वाघेला तेथे आले व बाबुला म्हणाले, १० ते १५ दिवसांपासून आमच्याकडे काय पाहतोस’, असे म्हणत शिवीगाळ केली. सनीने बाबुच्या डोक्यात कोयता मारला. अभिलेखने बाबुला पकडून ठेवले. बाबुला कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान जखमी झालेल्या बाबुला अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याने सोमवारी पोलिसांना जबाब दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.