
दिल्ली – पंजाबी गायक (Punjabi Singer) सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) यांच्या हत्येनंतर ‘सिख फॉर जस्टिस’ हा खलिस्तान समर्थक गट पुन्हा सक्रिय झाला आहे. या ग्रुपने पंजाबमधील प्रसिद्ध गायकांना एका व्हिडिओद्वारे ‘भारतातील पंजाबच्या आझादी’ला पाठिंबा देण्यास सांगितले आहे. रविवारी मूसवाला यांची जवाहर गावात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ‘एसएफजे’ने प्रसिद्ध पंजाबी गायकांना सांगितले आहे की ‘आता भारतापासून पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी खलिस्तान जनमत (सार्वमत) ला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे’. वृत्तानुसार, प्रतिबंधित संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नूने एका व्हिडिओ संदेशात गायकांना अकाल तख्त साहिब येथे 6 जून रोजी खलिस्तान सार्वमताच्या तारखेच्या घोषणेचे समर्थन करण्यास सांगितले आहे.
रिपोर्टनुसार, पन्नू म्हणाले, ‘पुढील बुलेटचे नाव किंवा वेळेचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.’ ‘डेथ इज इमिनंट सपोर्ट खलिस्तान’ असे शीर्षक असलेला हा व्हिडिओ सोमवारी यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.
एका फेसबुक पोस्टमध्ये, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी गोल्डी ब्रारने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या पंजाब पोलीस तिहार तुरुंगात बंद असलेल्या बिश्नोईला ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावा, असे म्हटले आहे. मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी पत्र लिहून या प्रकरणाची एनआयए आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.