धक्कादायक ! पाण्याची टाकी अंगावर पडल्याने 55 वर्षीय महिलेचा मृत्यू..

श्रीगोंदा ;- तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवासी असलेल्या लीला बाळासाहेब जगताप (वय वर्ष 55 ) ह्या आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये शेतीतील मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी काष्टी येथील बाळकृष्ण धोंडीबा पानसरे यांच्या पानसरे नर्सरी मध्ये काम करत असलेल्या लीला जगताप यांच्या अंगावर एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी फुटून पडली आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला आहे.
याबाबत बाळकृष्ण धोंडीबा पानसरे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यांनी नमूद केले की, माझा रोपवाटिकेची नर्सरी आहे. त्यात साधारण पंधरा महिला रोज मजूर काम करत असतात. या कामादरम्यान काम करत असलेल्या लीला बाळासाहेब जगताप राहणार लिंपणगाव यांच्या अंगावर 1000 लिटरची टाकी अचानक फुटून पडल्याने त्या खूप घाबरल्या. कामातून फोन आला मी लगेच घटनास्थळी गेलो. तातडीने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी त्या मयत झाल्याचे त्यांनी सांगितले.
पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फलके करीत आहेत.