
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वत: स्पष्ट केलं आहे की, माझा माझ्या सहकाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे. माझे सहकारी उत्तम काम करत आहेत आणि गृहमंत्री देखील उत्तम काम करत आहेत. हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत, या विरोधी पक्षाकडून पसरवल्या जात आहेत त्या निरर्थक आहेत.
तसेच, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांचं सरकार फार व्यवस्थित सुरू आहे. आताच मी ऐकलं की भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ते.. यांना मध्ये नाक खूपसायचं काय कारण आहे? की राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद पाहिजे. हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही सांगतो का तुमच्याकडे कोणाला विरोधी पक्षनेते पद पाहिजे, कोणाला आणखी काय हवं आहे, नाही ना. मग याला गृहमंत्रीपद हवं आहे, त्याला ते हवंय हे सांगणं तुमचं काम नाही. हे आम्ही तिघे बसून पाहू. परंतु या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भाजपाकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांना वाटत असेल की तीन पक्षांमधील वातावरण कलुशीत होईल, परंतु असं काही होणार नाही. तिन्ही पक्षांचा, संपूर्ण कॅबिनेटचा एकमेकांवर विश्वास आहे. नक्कीच काही कारवाया, काही पावलं जे आहेत…मला असं वाटतय त्याकडे मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. जे काही विषय समोर आहे. पण शेवटी हे सरकार, हे राज्य कायद्याचं आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
याचबरोबर, “केंद्रीय तपास यंत्रणा ज्याप्रकारे बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात घुसून राजकीय विरोधकांवरती कारवाया करत आहे. तसं महाराष्ट्र सरकार करणार नाही. यालाच कायद्याचं राज्य म्हणतात. राजकीय सूडाने किंवा बदल्याच्या भावनेनं कोणतीही कारवाई होणार नाही. यालाच कायद्याचं राज्य म्हणतात आणि ठाकरे सरकार हे कायद्याचं राज्य चालवत आहे. बेकायदेशीरपणे कोणतही कृत्य करणार नाही. ” असंही संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं.