
मुंबई – आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात मंगळवारी सामना झाला. या सामन्याचा नायक ठरला तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा रियान पराग होय.
त्याने 31 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या, या सामन्यात त्याने चार झेलही घेतले. सामनावीर ठरलेल्या रियान परागने या सामन्यात अनोखा विक्रम केला. एकाच आयपीएल सामन्यात 50 हून अधिक धावा आणि चार झेल घेणारा रियान हा तिसरा खेळाडू आहे आणि असे करणारा तो एकमेव भारतीय आहे.
रीयान आधी जॅक कॅलिस आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली आहे. 2011 च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना जॅक कॅलिसने पहिल्यांदा ही कामगिरी केली होती. त्याच्यापाठोपाठ अॅडम गिलख्रिस्टने 2012 च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाब) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात खेळला होता.
या सामन्यात परागने विराट कोहली, शाहबाज नदीम, सुयश प्रभुदेसाई आणि हर्षल पटेल यांचे झेल घेतले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 8 बाद 144 धावा केल्या. रायनशिवाय कर्णधार संजू सॅमसनने 27 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 19.3 षटकांत केवळ 115 धावांत सर्वबाद झाला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोघांच्या खात्यात 12-12 गुण आहेत, पण राजस्थान रॉयल्सचा नेट रनरेट चांगला आहे.