
मुंबई – मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या (Russia and Ukraine) दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे. आता पर्यंत या युद्धामुळे युक्रेनचा खाजगी आणि सार्वजनिक मालमतेचा नुकसान झाला आहे. तसेच सामान्य नागरिकांसह अनेक सैनिकांचा देखील मुत्यू झाला आहे. मात्र हा युद्ध लवकरच संपण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या लष्करानेच (Ukrainian army) असा दावा केला आहे.
या दाव्यानुसार, ९ मे रोजी रशिया हे युद्ध संपवू इच्छित आहे.समोर आलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला ( Russian army) युद्ध ९ मे पर्यंत संपलं पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे. ९ मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. याच दरम्यान रशिया आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाश्चिमात्य देशांनी नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून युक्रेनला माणुसकीच्या आधारावर मदत करण्याचं वचन दिलं. पण युक्रेनच्या राष्टाध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीच्या तुलनेत लष्करी सहाय्य कमी मिळत आहे.
तर राष्ट्रहित लक्षात घेऊनच देशाच्या परराष्ट्र धोरणाशी निगडित निर्णय घेतले जातात. रशिया-युक्रेन संघर्षांतील भूमिकाही त्याला अपवाद नाही. कुठल्याही देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे रशिया-युक्रेन यांनी तातडीने युद्धबंदी करून पूर्ववत शांतता निर्माण केली पाहिजे, असे स्पष्टीकरण केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत दिले.
भारत, अमेरिकेसह जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या ‘क्वाड’ गटामध्ये फक्त भारताने रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात संदिग्ध भूमिका घेतली असून त्याचा अमेरिकेशी असलेल्या व्यापारी संबंधावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा वरिष्ठ सभागृहात उपस्थित केला गेला. त्यावर जयशंकर म्हणाले, ‘‘या युद्धाशी आपला काही संबंध नाही, असे भारताने कधीही म्हटलेले नाही; पण युक्रेन युद्धाचा संबंध भारताचा कोणत्याही देशाशी असलेल्या व्यापारी संबंधांशी जोडू नये!’’ भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी एक टक्क्यापेक्षा कमी कच्चे तेल रशियातून आयात केले जाते. त्या तुलनेत इराककडून २३ टक्के, सौदी अरेबियाकडून १८ टक्के, संयुक्त अमिरातींकडून ११ टक्के, तर अमेरिकेकडून ७.३ टक्के कच्चे तेल आयात केले जात असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.