चर्होली खुर्द येथील रोकडोबा महाराज यात्रा उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न

आळंदी : खेड तालुक्यातील चर्होली खुर्द येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांची यात्रा (Rokdoba Maharaj Yatra)मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडली.गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग रोगाने थैमान घातले होते. कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी शासनाने नियम व अटी घालून दिलेल्या होत्या.त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रा,यात्रा,सण-उत्सव यावर बंदी घातलेली होती.सध्या कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव संपलेला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रा-यात्रा लोक आनंदाने साजरे करीत आहेत.चर्होली खुर्द गावातील श्रीरोकडोबा महाराज यात्रेसाठी राजकीय गट तट बाजूला सारून एका घोंगडीवर येऊन सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन उत्साही व भक्तिमय वातावरणामध्ये तीन दिवस ही यात्रा सुरू होती.
यात्रेत भव्य बैलगाडी शर्यत रविवार दि.२४ व मंगळवार दि.२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. बैलगाडी शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर ग्रामीण भागात बैलगाडी चालक-मालक व हौशी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.श्री रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते.यावेळी सरपंच स्वप्नाली पगडे,खरेदी विक्री संघाचे सभापती राजाराम लोखंडे,माजी सभापती अरूण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.बैलगाडी शर्यतीसाठी एकूण ३०० गाडा मालकांनी सहभाग नोंदविला होता.पहील्या आणि दुसर्या दिवसाच्या बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा हा किताब आनंदराव वर्पे आणि किरण साकोरे यांच्या बैलगाड्याने पटकवला.बैलगाडा फायनल मध्ये पहीला क्रमांक संतोष गावडे,द्वितीय क्रमांक आनंदराव वर्पे,तृतीय क्रमांक हभप गुलाबराव गिलबिले,चतुर्थ क्रमांक कांताराम पठारे यांच्या बैलगाड्याने पटकवला त्या सर्वांना दुचाकी गाडी देऊन गौरवण्यात आले.तसेच सहभागी सर्व गाडामालकांना ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे पा. याच्याकडून घड्याळ भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
रोकडोबा महाराज उत्सवा निमित्ताने चर्होली खुर्द येथे आकर्षक जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी सहभाग नोंदवला यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील चर्होली बुद्रुक येथील पै.योगेश तापकीर या पैलवानाने अंतिम सामन्यात रोकडोबा महाराज केसरी ही मानाची कुस्ती जिंकली.त्याला मानाचा रोकडोबा महाराज केसरी किताब आणि गदा देऊन गौरवण्यात आले असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष निखिल थोरवे,उपाध्यक्ष रामदास घोलप,सुभाष थोरवे (बारामतीकर) यांनी सांगितले.
मिस्टर युनिवर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक विजेता चर्होली खुर्द गावातील महेंद्र पगडे आणि राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत चर्होली खुर्द येथील विशाल थोरवे यांने महाराष्ट्र चॅम्पियन्स हा किताब पटकवला त्या निमित्ताने त्या दोघांचा चर्होली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला होता.