शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजेंद्र मस्के यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु; अधिकारी वर्गांनी फिरवली पाठ

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत बील माफ करणे, शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीजपुरवठा, हिरडगाव व घारगाव येथे विद्युत उपकेंद्र मंजुरी, कुकडी कालव्याच्या १२,१३ व १४ क्रमांकाच्या वितरीकेंच्या संपादीत जमिनींचा मोबदला मिळण्यासाठी तातडीने पालकमंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेणे तसेच कुकडी कालवा बारमाही करून डिंभे धरण ते येडगाव धरणाच्या बोगद्याचे तातडीने काम सुरू करावे या शेतकऱ्यांशी निगडित अनेक प्रश्न तातडीने सोडण्यासाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते राजेंद्र मस्के यांनी सोमवार दि. ४ रोजी पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते त्यानंतर त्यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन म्हणजे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी जलसंपदा मंत्री, ऊर्जामंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे की वीज वितरण कंपनीचे सध्या भारनियमन सुरू असून वीज पुरवतानाही कमी दाब, खंडित करणे हे प्रकार सुरू असूनही शेतकऱ्यांना वीज आकारणी मात्र पूर्ण वेळेची घेतली जात असून या तुघलकी कायद्यामूळे बळीराजा हैराण झाला आहे. हिरडगाव व घारगाव येथे मोठ्या क्षमतेचे विद्युत उपकेंद्र सुरु करावे. तालुक्यातील कुकडी कालव्याच्या वितरीका क्रमांक १२,१३ व १४ यांच्या भूसंपादीत झालेल्या जमिनींचा तातडीने मोबदला मिळण्यासाठी पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाची सोडवणूक करावी. त्याचप्रमाणे तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात अडचणींची भर घातली जात आहे. कुकडीचे आवर्तन आठमाही असूनही प्रत्यक्षात रब्बीचे व उन्हाळी एक एक आवर्तनच दिले जात असल्याने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. आवर्तन बारमाही करून डिंभे ते माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे व कागदावरील साकळाई योजना प्रत्यक्षात आणावी.
या इतर अनेक मागण्यांसाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते राजेंद्र मस्के यांनी सुरवातीला धरणे आंदोलन सुरु केले होते मात्र त्यानंतर त्यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन म्हणजे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, राजकीय नेते, विविध गावांमधील सरपंच, सेवा संस्था चेअरमन, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.मात्र या आंदोलन व उपोषण याला अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने नागरिकांमधून अधिकाऱ्यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.