राज ठाकरे यांनी घेतली भूमिका अन् पदाधिकारी झाले नाराज; वसंत मोरेंनी उचललं मोठं पाऊल

या पार्श्वभूमीवर आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांनी मनसेत कोणताही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, मंगळवारी संध्याकाळी पुणे शहर कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवाण्यात आली आहे. या बैठकीत मनसेतील नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल, असे बोलले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मनसेचे काही नगरसेवकही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे. यापैकी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, इतर नेते व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी अद्याप संभ्रम आहे.
तर दुसरीकडे पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.
‘राजसाहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट आणली होती अन् ते म्हणाले होते मी शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट मध्ये आणणार. त्यामुळे राजसाहेब माझे आदर्श होते अन् म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला होता. पण आता राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलली आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे’, असे माजिद शेख यांनी स्पष्ट केले होते.