
“कोणताही निर्णय घेताना दोन्ही बाजूचे परिणाम पहावे लागतात, त्यानंतर राज्य सरकारची भूमिका ठरवावी लागते. एकदा पोलीस महासंचालक, आयुक्तांच्या स्तरावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलू आणि नंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
“परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. “कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल,” असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला.
“सगळ्या देशात एकाप्रकारे काही घटक अशांतता वातावरण निर्माण करत असून महाराष्ट्रातही प्रयत्न सुरु आहेत. पण महराष्ट्र पोलीस पूर्ण तयार आहेत. अशांततेतेच वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. दंगलीचा कट असल्याची काही माहिती नाही. पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. आम्ही त्यानंतर मुख्यमंत्री तसंच सर्व गुप्तचर यंत्रणांशी बोलू आणि परिस्थिती हाताळण्यासंबंधी निर्णय घेऊ,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. “पोलीस महासंचालक, आयुक्तांची बैठक होणार असून त्यानंतर रिपोर्ट येईल. त्यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,” असंही ते म्हणाले.