राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; हवामान विभागाचा इशारा

मुंबई – मागच्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना झोडपून काढले आहे. तर आता राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली (Kolhapur, Satara, Sangli, Solapur, Osmanabad, Latur, Parbhani, Nanded and Hingoli) या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट‘ जारी करण्यात आला आहे.
Related Posts
तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्याच्या अपेक्षेच्या काही दिवस आधीच केरळमध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी पाच जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत देऊन हवामान खात्याने येथे रेड अॅलर्ट जारी केला आहे.
एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, मलप्पुरम, कोझिकोडे जिल्ह्यांना रविवारसाठी तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, कन्नूर या जिल्ह्यांना सोमवारसाठी हा इशारा देण्यात आला. आणीबाणीच्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे महसूलमंत्री के. राजन यांनी पत्रकारांना सांगितले.