
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
पुणे – गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध केल्याने पुणे शहराचे (Pune City)अध्यपदावरून वसंत मोरे ( Vasant More) यांची हकालपट्टी करण्यात आली असून आता त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar)यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.
तर दुसरीकडे आता वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक चर्चंना उधाण आले आहे. वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अशातच मनसेत झालेल्या उलथापालथीमुळे पक्षाला या निवडणुकीत फटका बसण्याच शक्यता आहे. कारण वसंत मोरे हे पुण्यात मागील १५ वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत आणि तरुणांमध्ये ते विशेष लोकप्रियदेखील आहेत.
मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर तुम्हीही हनुमान चालिसेचं पठण करा, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र मला माझ्या प्रभागात शांतता ठेवायची आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी राज यांचा आदेश धुडकावला. त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावून घेत मनसेचे विद्यमान नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.