
अहमदनगर – श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश, श्री. एन.जी. शुक्ला यांनी नुकत्याच संबंधातून सखा मेहुणा याचा तुकडे करुन खून करुन ते शवाचे तुकडे व मुंडके वेगवेगळ्या विहीरीत टाकुन पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणी मागील पाच वर्षापासून अधिक कालावधीसाठी कैद असलेला आरोपी दादासाहेब अंकुश रोडे, रा. मतेवाडी, ता. जामखेड व आरोपी क्र.२ त्याचा पिता अंकुश देवराव रोडे व आरोपी क्र. ३ फुलाबाई पागीरे या तिनही आरोपींचीनिर्दोष मुक्तता केली आहे.
पायलटने महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले, DGCA निलंबित, एअर इंडियाला 30 लाखांचा दंड.
या प्रकरणाचे वैशिष्ठ असे की यातील आरोपी क्र. १ दादासाहेब रोडे हा मागील पाच वर्षांपासून कारागृहात कैदेत होता व सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचे जामीन वेळोवेळी फेटाळण्यात आलेले होते. प्रकरणाची हकीकत अशी की, दि. २९/९/२०१७ रोजी जामखेड पो.स्टे. येथे पोलीस कर्मचारी विठ्ठल चव्हाण यांचे तक्रारीवरुन मुंजेवाडी शिवारातील भरत रासकर यांचे विहीरीत दि. २८/७/२०१७ व दि. २९/७/२०१७ असे दोन दिवस एका अनोळखी पुरुषाचे हातपाय तोडलेले धड, तसेच दुस-या दिवशी तोडलेले हातपाय असे विहीरीत मिळून आले होते. त्याप्रकरणाचे तपासात वरील प्रमाणे चौकशी सुरु झाल्यानंतर दि. २९/७/२०१७ रोजी भा.द.वि. कलम ३०२, २०१, ३४ नुसार खूनाचा गुन्हा अज्ञात आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे तपासात संशयावरुन सदरचे प्रेत हे रिठेवाडी येथील राहुल रिठे याचे असल्याचा संशय व्यक्त करुन प्रेताचे नमुने डी.एन.ए. तपासणीस पाठविण्यात आले होते आणि तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकरणातील मुख्य आरोपी दादासाहेब रोडे यास पोलीसांनी अटक केली होती. त्यानुसार दादासाहेब रोडे याने अनैतिक संबंधाचे कारणावरुन त्याचा सख्खा मेहुणा राहुल रिठे याचा मुंडके तसेच हातपाय तिक्ष्ण हत्याराने कापून खून केला व ते पुरावे नष्ट करण्यासाठी ते वेगवेगळ्या गोणीत बंद करुन फेकुन दिले असा पुरावा आढळल्याने तपासा दरम्यान त्याला व त्याचे वडील अंकुश रोडे, बहिण फुलाबाई पागीरे यांना प्रकरणात मदत केल्याचे आरोपावरुन अटक करण्यात आले होते.
सन २०१७ मध्ये सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर व क्रुरपणे खून केल्याचे असल्याने त्याचा प्रचंड गवगवा होऊन जामखेड तालुका या घटनेने हादरलेला होता. प्रकरणात तपासाअंती आरोपीने वरील प्रमाणे निर्धयीपणे दादासाहेब रोडे याने इतर आरोपींच्या मदतीने राहुल याचा खून करुन प्रेताचे तुकडे करुन विल्हेवाट लावली असा भक्कम पुरावा पोलीसांद्वारे न्यायालयात दोषारोपपत्रात सादर करण्यात आला होता व आरोपी याचे निवेदनावरुनच पोलीसांनी मयताचे मुंडके हळगाव येथील एका विहीरीतून हत्यारासह जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे यांनी केलेला होता. प्रकरणामध्ये आरोपी क्र. १ दादासाहेब रोडे हा शेवटपर्यंत कारागृहामध्ये अटकेत होता व त्याचे वतीने व त्याचे वडील यांचे वतीने प्रकरणात अॅड. सतिश गुगळे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात एकुण १४ साक्षीदार तपासले व मयताचे प्रेताचा डी.एन.ए.चा भक्कम पुरावा सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आला होता. तसेच आरोपी दादासाहेब याचे निवेदनानुसार जप्त मुंडके देखील खूनाच्या हत्यारासहीत आरोपीकडून जप्त करण्यात आले होते.
एवढेच नव्हे तर घटनेच्या दिवशी मयत राहुल यास आरोपी सोबत जाताना यातील दोन साक्षीदारांनी पाहिल्याचा पुरावा देखील सरकार पक्षातर्फे न्यायालयामध्ये सादर करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. सतिश गुगळे यांनी मयताचे जप्त मुंडके हे मयताचे नाही तसेच आरोपी विरुद्ध सादर करण्यात आलेला सर्व पुरावा हा कशापद्धतीने रचून बनावट तयार केलेला आहे असा युक्तीवाद करत प्रकरणातील गंभीर अशा बाबी व कच्चे दुवे हे न्यायालयाचे निदर्षणास आणून दिले व मयतासोबत आरोपीस घटनेच्या दिवशी पाहिल्याचा पुरावा, मुंडके व हत्यार जप्तीचा पुरावा तसेच आरोपी यास मयताचा खून करण्यासाठी दर्शविण्यात आलेला
अनैतिक संबंधाचा हेतू या सर्व बाबी या कशा पद्धतीने पोकळ व तथ्यहिन आहेत या बाबत सविस्तरपणे साक्षीदारांची उलट तपासणी करुन त्याबाबत प्रभावीपणे न्यायालयापुढे युक्तीवाद केला होता. आरोपी दादासाहेब रोडे यास शेवटपर्यंत जामीन मंजूर न झाल्याने मागील पाच वर्षांपासून आरोपी हा कारागृहात बंदीस्त होता व अशापरिस्थितीमध्ये आरोपी यास प्रकरणात बनावटपणे गोवण्यात आले आहे व त्या विरुद्धचा पुरावा हा संशयास्पद तसेच बनावट असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिले या सर्व बाबी, प्रकरणामध्ये असलेले कच्चे दुवे, जबाबातील विसंगती व बनावट पद्धतीने सादर केलेला पुरावा असे युक्तीवादातील अॅड. सतिश गुगळे यांनी सादर केलेले मुद्दे मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. एन.जी. शुक्ला यांनी ग्राह्य धरत तीनही आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात आरोपी दादासाहेब अंकुश रोडे व वडील अंकुश देवराव रोडे या दोन आरोपींच्या वतीने अॅड. सतिश गुगळे यांनी काम पाहिले, त्यांना अॅड. महेश देवणे, अॅड. हेमंत पोकळे, अॅड. घनश्याम घोरपडे, अॅड. अक्षय गवारे, अॅड. चंद्रकांत भोसले, अॅड. अजित चोरमले यांनी सहकार्य केले