
मंगेश कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीसह आई वडिलांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले. या अपघातात कुडाळकर आणि त्यांची दोन मुले थोडक्यात बचावली. त्यानंतर, त्यांनी कुर्ला परिसरात राहणाऱ्या रजनी यांच्याशी विवाह केला. रजनी यांना पहिल्या पतीपासून दोन मुले होती. त्यांचीही जबाबदारी कुडाळकर यांनी स्वीकारली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रजनी यांचा मुलगा प्रज्वल याचा चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा हर्षल त्यांच्यासोबत राहण्यास होता. पहिल्या मुलाच्या निधनामुळे त्या तणावात होत्या. त्यातच रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येपूर्वी त्यांनी मुलगा हर्षलच्या मोबाईलवर पाठवलेल्या अखेरच्या संदेशामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर, त्यांचा मुलगा हर्षल थेट पोलीस ठाण्यात आला होता.
पोलिसांचा मात्र दुजोरा नाही
हर्षलला केलेल्या संदेशात एका महिलेचा उल्लेख करण्यात आला आहे. ही महिला त्यांच्या पहिल्या पतीच्या कुटुंबीयांपैकी एक असल्याचेही समजते. पोलीस रजनी यांचा मोबाईल ताब्यात घेत अधिक तपास करत आहेत. या संदेशाबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी दुजोरा दिला नाही.