
रवी राणा म्हणाले की, आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही स्वताहून हे आंदोलन मागे घेत आहोत. बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असं राणा म्हणाले. भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.
रवी राणा यावेळी म्हणाले की, आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठे होती. पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं. आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले. आमच्या घरात शिवसैनिक घुसले, पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत, असंही राणा म्हणाले.
राणा म्हणाले की, महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेनं निघाली आहे. पंतप्रधान विकासाचा संकल्प घेऊन महाराष्ट्रात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतंय की कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी, पंतप्रधानांचा दौरा रद्द व्हावा. हनुमान चालिसाचा एवढा विरोध का आहे? या महाराष्ट्राची व्यवस्था बिघडवण्याचं काम हे लोकं करत आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये आणि पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.