
औरंगाबाद – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची बहुचर्चित सभा १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी नियम आणि अटींसह परवानगी दिली आहे. राज ठाकरे आज पुण्यावरून औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहे. या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांना औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.
खासदार जलील यांनी काल औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची देखील भेट घेतली आहे.त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार जलील म्हणाले की “मी आज पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी इथे आलो होतो आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना हे देखील सांगितले आहे की, आपल्या शहरात शांतात आणि सुव्यवस्था राहावी यासाठी आमची कशाप्रकारे तुम्हाला मदत अपेक्षित आहे ते तुम्ही सांगावं
“राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल.” असं म्हणत जलील यांनी या इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचं राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं.
“९९ टक्के लोक शांतात प्रेमी आहेत, केवळ एक टक्का लोक अडथळे निर्माण करतात. माझा विश्वास आहे की पोलीस अशा १ टक्के लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम आहे. मग ते कोणत्या पक्षाचे, समुदायाचे आहेत त्याने काही फरक पडणार नाही. जे राजकारण करण्यासाठी आले आहेत त्यांना राजकारण करावं, जे प्रार्थना करू इच्छितात त्यांना प्रार्थना करू द्यावी. असंही खासदार जलील यांनी बोलून दाखवलं आहे. ”