
दिल्ली – काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासबोत राज्यातील २० ते २५ काँग्रेसच्या नाराज आमदारांनी भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधी यांच्यासमोर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या आमदारांनी सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत केल्याची माहितीसमोर आली आहे.
राज्यातील काँग्रेस आमदार सोनिया गांधी यांना भेटत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा विधीमंडळ पक्षाचे गटनेते या बैठकीला उपस्थिती नव्हते. या बड्या नेत्यांना टाळून नाराज आमदारांनी थेट सोनिया गांधी यांना भेटणं पसंत केलं. यावेळी सोनिया गांधी यांनीही आमदारांनी आपलं म्हणणं मांडण्यास पुरेपूर वेळ दिला. त्यामुळे या बैठकीनंतर आता राज्यातील काँग्रेस मंत्र्यांमध्ये काही फेरबदल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.