सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी DNA मराठी टीम
अहमदनगर – नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याने या छळास कंटाळून विवाहितेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना वडगाव गुप्ता शिवारात घडली आहे. पल्लवी शाम गायकवाड (वय 32, रा. येशूकृपा कॉलनी, शेंडी बायपास रोड, वडगाव गुप्ता) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचा भाऊ मिलिंद कानडे (रा. काटवन खंडोबा रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम झुंबरराव गायकवाड (पती) , झुंबरराव बुगाजी गायकवाड, बबई झुंबरराव गायकवाड, फिलीप झुंबराव गायकवाड (सर्व रा. येशूकृपा कॉलनी, शेंडी बायपास रोड) आणि मंगल राजू गायकवाड (रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत पती शाम झुंबरराव गायकवाड याला अटक केली असून इतर आरोपी फरार झाले आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे. वरील सर्व आरोपी विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.दं. वि.क. 306, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार यापूर्वी देखील मृत पल्लवी गायकवाडवर सासरच्या लोकांकडून पैसे आणि विविध मागणीसाठी वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. यापूर्वी देखील मयत पल्लवीने आरोपी पती शाम गायकवाड विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.