जमावाच्या मारहाणीमुळे इसमाचा मृत्यू; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!

श्रीगोंदा :- शहरातील रहिवासी असलेल्या पाच जणांनी सचिन विठ्ठल जाधव (वय वर्ष 35 राहणार शिक्षक कॉलनी श्रीगोंदा) या इसमास कैकाडी गल्ली येथे दारू पिऊन येण्यास मज्जाव करत मारहाण केली आहे. त्या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने नमूद इसमाचा दिनांक 26 मे 2022 रोजी 4:00 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेला सचिन विठ्ठल जाधव यास दिनांक 22 मे 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास महंमद महाराज पटांगणातील मज्जिद जवळ उभा असताना अक्षय गायकवाड (राहणार वेळु रोड ), ऋतिक जाधव (राहणार कैकाडी गल्ली) विशाल गायकवाड (राहणार पंचायत समिती मागे) , समीर काझी (राहणार महंमद महाराज मंदिरासमोर) आणि बापू माने (राहणार शनी चौक श्रीगोंदा) यांनी तू आमच्या गल्लीत दारू पिऊन यायचे नाही..! असे म्हणून, शिवीगाळ करत छातीवर, पोटात जोर-जोरात लाथांनी मारहाण केली. तसेच, लाकडी दांडक्याने पाठीवर पायावर तसेच उजव्या पायाच्या खुब्यावर मारहाण करून जखमी केले.
त्यास झालेल्या जखमामुळे दिनांक 26 मे 2022 रोजी सायंकाळी 4:00 वाजण्याच्या सुमारास सचिन जाधव मयत झाला. म्हणून मयत सचिनचा भाऊ सागर विठ्ठल जाधव वय वर्ष 19 राहणार शिक्षक कॉलनी, श्रीगोंदा याने नमूद पाचही जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
त्याने दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने नमूद पाच इसमांवर भादवि कलम 302, 143, 147, 148, 149 व 504 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरील मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास प्रक्रियेसाठी उत्तरीय सूक्ष्म निरीक्षण अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.