
मुंबई – मागच्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणूने (Corona Virus) सध्या चीनमध्ये (china) कहर केला आहे. चीनमध्ये सध्या ५ कोटी पेक्षा जास्त नागरिक कोरोनामुळे घरात लॉक (Lock) झाले आहे. चीनच्या पाच मोठ्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. मागच्या शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन रुग्णांची नोंद गेल्या दोन वर्षांतील सर्वात जास्त होती. याच दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाउन बद्दल सूचक विधान केला आहे.
चीनमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असून लॉकडाऊन लावण्यात आल्यासंबंधी विचारले असता राजेश टोपे यांनी सांगितलं की, “आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे. आपण काळजी घेतली पाहिजे. जगभरात कोरोनाची चौथी लाट दिसत आहे त्यातून शिकवण घेण्याची गरज आहे. निष्काळजीपणे वागणं चुकीचं आहे आणि त्याची परवानगी नाही. लोकांनी सतर्क राहिले पाहिजे”.
मास्कमुक्त महाराष्ट्र होणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, “मास्कमुक्त महाराष्ट्र बाबत चर्चा सध्या करणार नाही. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करावे. मास्क लोकांनी घातलाच पाहिजे”.
देशात दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.