
श्रीगोंदा – तालुक्यातील राजेंद्र नागवडे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चला हवा येऊद्या या कार्यक्रमाच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला. कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला करण्यात आल्याच्या पोस्ट नागवडे समर्थकांनी व्हायरल केल्याने कौटुंबिक कार्यक्रमावरील आयोजकांचा ताबा सुटून हुल्लडबाजी झाल्याचे पहायला मिळाले.
Related Posts
श्रीगोंदयातील छत्रपती महाविद्यालयाच्या मैदानात चला हवा येऊद्या हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत कार्यक्रम कौटुंबिक असून तो शिस्तबद्ध होणार असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडली. या कार्यक्रमासाठी वेगवेगळे पास छापण्यात आले होते. परंतु, नागवडेंच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्याने गर्दी वाढली.
परिणामी, अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेअभावी आयोजकांनी केलेल्या नियोजनाचा पुरता फज्जा उडून कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शांततेचे आवाहन करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आयोजकांनी उपस्थितांसमोर झुकते घेत आहे त्या स्थितीत कार्यक्रम सुरू केला. परंतु, त्यातही काहींनी हुल्लडबाजी केल्याने कुटुंबियांना घेऊन आलेल्या अनेकांना त्रास सहन करावा लागला. कौटुंबिक कार्यक्रमाला वेगळेच रूप प्राप्त झाल्याने अनेकांनी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून जाणे योग्य मानले. मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करताना सुरक्षा व्यवस्था चोख असणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमामुळे नागवडेंची ‘हवा’ होण्याऐवजी तयार होणे तर दूरच परंतु बिघडलेले नियोजन अन् कौटुंबिक कार्यक्रमात झालेली हुल्लडबाजी याचीच जास्त चर्चा रंगली होती.
पैशे गेले अन अब्रू पण ?
राजेंद्र नागवडे यांनी लाखो रुपयांची उधळण करत तालुक्यातील जनतेसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आणला होता पण नियोजन शून्य कारभारामुळे जनतेमधून नाराजीचा सूर पसरला असल्यामुळे जनतेमधून पैसे तर गेलेच पण अब्रू पण गेलीच अशी चर्चा ऐकण्यास मिळत होती.
भावी आमदार वहिनीच ?
तालुक्यात अनेकांनी आमदारकी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी धडपड सुरू केली असली तरीही जनतेमधून अनुराधा नागवडे यांच्याच नावाची जास्त चर्चा ऐकण्यास मिळत असल्याने भावी आमदार अनुराधा वाहिनीच होईल अशी जोरदार चर्चा ऐकण्यास मिळाल्याने अनेकांनी स्वप्न धुळीला मिळणार असेच दिसत आहे.