
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील गणपती कारखान्यात कामाला असलेल्या मजुराला कामावर उशिरा का आला असे विचारल्याचा राग आल्याने या मजुराने कारखाना मालक खंडू चंदन यांच्या आईवर चाकूने हल्ला करून जखमी करत पळून जाणाऱ्या मजुराला दोन तरुणांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या हवाली केले.
मयूर संजय भागवत रा.शिवाजीनगर अहमदनगर असे ताब्यात दिलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात वृद्धावर चाकूने हल्ला करत जखमी केल्या प्रकरणी खंडू काशीनाथ चंदन यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट देऊन पाहणी करत पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांना तपासाबाबत सूचना केल्या. या बाबत कोळगाव येथील गणपती कारखानदार खंडू काशीनाथ चंदन यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या गणपती कारखान्यातील सुट्टीला गेलेला कारागीर ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माघारी आला. त्यावेळी फिर्यादी यांची आई ताराबाई यांनी त्याला कामावर काल येणार होता, कामावर येण्यास उशीर का झाला ? असे विचारल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादात त्याने ताराबाई यांना तुम्हाला बघुन घेईन असे म्हणत धमकी दिली. यावेळी फिर्यादी यांनी दोघांचा वाद मिटवत दोघांना शांत केले.
Related Posts
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सर्व जण जेवण करून झोपयला गेले असता साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी याने ताराबाई यांच्या
मानेवर आणि हातावर चाकूने गंभीर जखमी केले. मात्र यावेळी जखमी वृद्ध महिलेने जोरात आरडा ओरडा केल्याने कुटुंबातील सर्वजण काय झाले हे पाहण्यासाठी गेले असता वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे दिसून आले व तेथे आरोपी मयूर भागवत हा हातात चाकू घेऊन उभा असल्याचे दिसून आला. घरातील सर्वजण आल्याचे पाहून आरोपीने चाकू तेथेच टाकून तेथून पळ काढला असता त्यावेळी फिर्यदीचा चुलत भाउ आकाश चंदन व शेजारी राहणारे गौरव पुरी यांनी आरोपीचा पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केले. जखमी वृद्धेला नातेवाईकांनी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करीत दाखल केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे हे करत आहेत.