
प्रतिनिधी DNA मराठी टीम
कोल्हापूर – आज ‘कोल्हापूर उत्तर’ची पोट निवडणूक (Kolhapur ‘North’ by-election) चुरशीची होत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार मतदारांना विविध प्रलोभने दाखवून मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला सोमवारी वारे वसाहत, मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर, दसरा चौकातील सुतारवाडा परिसरात मतदारांना पैशाचे वाटप करण्याचा प्रयत्न झाला. जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हे नोंदवले. तर तिन्हीही घटनेतील १ लाख २६ हजार ३० रुपये पोलिसांनी जप्त केले.
आज, मंगळवारी मतदान होणार असल्याने मतदारांना पैशाची प्रलोभने दाखविण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाची भरारी पथके, पोलीस पथके तसेच विरोधकांची कार्यकर्त्यांची फळी सतर्क झाली होती. त्यातूनही मतदारांना पाकिटातून पैसे वाटण्याचे प्रसंग घडले. त्यावर काही मतदारांची नावेही मिळून आली. गुन्हा दाखल सहा जणांवर भा. दं. वि. कलम १७१ ई प्रमाणे अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या महाविकास आघाडीच्या तक्रारी या पराभवाच्या नैराश्येतून केल्या असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली. बुथवरील कार्यकर्त्यांना जेवणाचे पैसे द्यायचे नाहीत का, त्यांच्याकडे काय लाखाचे डबोले सापडले की काय, अशी विचारणाही त्यांनी केली.
यावेळी पाटील म्हणाले की कोल्हापूर उत्तरसाठी आज मतदान होत आहे. आमचे कार्यकर्ते बुथ रचनेची माहिती घेत फिरत आहेत. बुथवर काम करणाऱ्या लोकांच्या जेवणासाठी म्हणून त्यांना काही रक्कम दिली जात असताना, त्यांच्याविरुध्द पैसे वाटताना सापडले म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. परंतु अशा गुन्ह्यांना भाजप घाबरत नाही. पोलीस यंत्रणांचा वापर करून ही दडपशाही सुरू आहे. या मतदार संघात भाजपचा विजय होणार हे नक्की असल्यानेच, शेवटचा प्रयत्न म्हणून कार्यकर्त्यांना असा त्रास दिला जात आहे.