
दिल्ली – देशात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ज्ञानवापी मशिदीचं (gyanvapi masjid) सर्वेक्षण सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यातच हिंदू पक्षाच्या वकिलाने मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले. या सर्वेक्षणादरम्यान विहिरीत शिवलिंग सापडलं आहे. हिंदू पक्षाच्या वकिल विष्णु जैन यांनी असा दावा केला आहे .
ज्ञानव्यापी मशिदीमध्ये मंदिराचे अवशेष असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून ज्ञानव्यापी मशिदीच्या व्हिडीओग्राफी सर्वेक्षणाला सुरुवात झाली. रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू होते. मात्र या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण झालं नसल्यामुळे सोमवारी पुन्हा सर्वेक्षण करण्यात आलं.
या सर्वेक्षणादरम्यान, नंदीसमोर असलेल्या विहिरीत कॅमेरा टाकून शोध घेण्यात आला. या विहिरीतच शिवलिंग सापडल्याचा दावा जैन यांनी केला आहे. आता ते शिवलिंगाच्या संरक्षणासाठी सत्र न्यायालयात जाणार आहेत.
ज्ञानव्यापी मशिदीचे आज सर्वेक्षणाचे काम झाल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी आमचा दावा मजबूत असल्याचा पुनरुच्चार केला. आमचा दावा आधीच मजबूत होता आणि आजच्या सर्वेक्षणामुळे तो अधिक मजबूत झाला, असा दावा हिंदू संघटनांनी केला. मात्र मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मीडियासमोर येत सर्वेक्षण करणाऱया टीमला आतापर्यंत कोणताही सबळ पुरावा मिळाला नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जोपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीच सांगणे योग्य होणार नाही, अशी भूमिका याच्याशी संबंधित वकिलांनी घेतली आहे.